Thursday, November 8, 2018

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 
भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

No comments:

Post a Comment