Monday, December 17, 2018

शालेय भाषणे

  2 राष्ट्रीय युवक दिनानिमित्त

बलशाली युवक घडवणे हेच उद्दिष्ट

स्वामी विवेकानंदांची जन्म दिन युवक दिन म्हणून साजरा  केला  जातो . या राष्ट्रातील तरुण जर सदृढ आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील तर हे राष्ट्र जगातील आघाडीचे प्रगतीचे राष्ट्र ठरू शकेल. असा विश्वास स्वामी विवेकानंदाना होता. म्हणूनच देवळात जाऊन भजन पूजन करण्यापेक्षा आणि तारुण्यात अध्यात्मिक ग्रंथ हातात घेऊन वाचत बसण्यापेक्षा मैदानावर जाऊन तरुणाने खेळावे हे स्वामींना अभिप्रेत होते. हे राष्ट्र पुढील काही वर्षात जगातील तरुण राष्ट्र म्हणून जगाच्या समोर येणार आहे. जग बदलत असताना या तरुण राष्ट्राचा धसका अनेक मोठ्या राष्ट्रांनी घेतला आहे. भारतात  मोठ्या प्रमाणत तरुणानाची संख्या आहे. जी पुढे अजून काही वर्ष वाढत राहणार आहे. अमेरिका चीन जपान अशा प्रगत राष्ट्रात पुढील काळात एवढ्या मोठ्या प्रमाणत तरुण नसतील. त्यामुळे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलम यांनी या नव्या उगवत्या पिढीच्या आशेवर काही गणिते मांडली आणि त्यातून एक निष्कर्ष काढला आहे कि पुढील काही वर्षात हे राष्ट्र जगातील महासत्ता होऊ शकते.

भारतातील लोकसंख्या जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. त्यामुळे इथले काही प्रश्न आणि समस्या निश्चितच जास्त असणार आहेत.  तरुणाकडून या देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्वातंत्रपूर्व काळातील तरुणांनी राष्ट्रासाठी बलिदान दिले. भारताला स्वतंत्र करणे हे एकमेव उद्धेश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी जीवनभर वाटचाल केली. आज हि काही प्रमाणत अशाच उद्धेशाची आवश्यकता आहे. देश स्वतंत्र झाला आहे. पण समाजातील  जाती धर्मातील तेढ, व्यसनाधीनता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, लोकशाहीची होत असलेली पायमल्ली, तरुणांच्यातील वाढत असलेला चंगळवाद, अशा अनेक मोठ्या शत्रू बरोबर लढत आपल्याला युवक उभे करायचे आहेत. याचा अर्थ समाजातील सर्व युवक या समस्यांनी ग्रासले असे म्हणायचे नसून आपले मित्र आज अशा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांना या सर्वांपासून आपल्याला मुक्त करायचे आहे. गाव शहर असा भेद संपुष्टात येत आहे. त्यामुळे सर्वच युवक हे बलदंड आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद म्हणत देवावर विश्वास आहे किवा नाही यापेक्षा युवकांचा स्वतः वर विश्वास आहे का यावरूनच त्याचे व्यक्तिमत्व घडते. खरा आस्तिक तोच आहे जो आपल्या मनात नवा विचार घेऊन पुढे जातो. ज्याच्यामध्ये आभाळाला शिवायची धमक असते आणि क्षितिजाला पार करण्याची उर्मी असते. अशा तरुणांच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्र उभे राहते.

खूप मोठ्या प्रमाणात अशा हजारो लाखो तरुणानाची साथ भारतमातेला आजही आवश्यक आहे. जाती धर्मावर प्रेम करत बसण्यापेक्षा भारत मातेवर प्रेम करणारा तरुण युवक या देशाला प्रगती पथावर नेऊ शकतो. चांगले इंजीनीर्स, डॉक्टर्स, राजकारणी, समाजसेवक, आदर्श नागरिक, अधिकारी या नव्या पिढीतून घडत असतात त्यासाठी चांगल्या संस्कारांची तरुणाची या देशाला नेहमीच गरज आहे.      राजकारणामुळे सगळ्यात जास्त युवकांचे नुकसान होत आहे. अनेक व्यसने आणि पैसा याची सवय लागली आहे. त्यामुळे नंतर हा तरुण प्रगतीच्या मार्गावर येत नाही. भारतातील राहणाऱ्या सर्वांची जबाबदारी वाढत आहे. या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले युवक तरुण घडवले पाहिजेत. समाजाची जाण आणि संवेदनशील तरुणाच या देशाला महान राष्ट्र बनवू शकतात. आज आदर्श लोप पावत आहेत असे म्हणणे सयुक्तिक वाटणार नाही कारण आजही समाजाच्या दूर राहून गडचिरोली चंद्रपूर या राज्याच्या दुर्गम भागात आदिवासी समाजासाठी काम करणारे बाबा आमटे यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे अनिकेत आमटे, कौस्तुब आमटे, या सारखे तरुण आहेत.  कराड येथे गेल्या दहा वर्षापासून स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील तरुण जो व्यसनमुक्त आणि बलशाली असेल असे पाच हजार तरुण दर वर्षी घेऊन युवक दिन साजरा करणारे इंद्रजीत देशमुख तरुणाच आहेत. जेष्ठ कीर्तनकार युवक मित्र बंडातात्या कराडकर यांनी देखील महाराष्ट्रात व्यसनमुक्त युवक संघ स्थापन करून हजारो तरुणांना राष्ट्र भक्ती, व्यसनमुक्ती, युवाशक्ती असा नवा मंत्र दिला. अमरावती येथे प्रयास या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर अविनाश साहुजी यांनी तरुणांना समाजसेवेचा वसा देत एक नवा प्रयास सुरु केला आहे. चांगल्या सशक्त तरुणांचे बियाणे तयार करण्याचे काम या मंडळी मार्फत सुरु आहे. समाजाला नवी दिशा तरुणांना प्रेरणा आणि सामाजिक जाणीव करून देणारी हि आदर्श आजही हजारो तरुणांच्या समोर उभे आहेत.
युवकासमोर अनेक समस्या आणि अडचणी आहेत. पण मी त्या मांडू इच्छित नाही. नकारात्मक विचार सतत करण्यापेक्षा वर सांगितलेय आदर्शांचा विचार करू या !. स्वामी विवेकानंदांचा जन्म दिवस सार्थकी लागण्यासाठी युवकांकडून स्वामीजींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण युवक दिना पासून  व्यसनमुक्त होऊ या! . आज पासून समाजाच्या हिताचे काम करू या! असा संकल्प करत आज आपण नवा चांगला बलशाली तरुण घडवण्याची प्रक्रिया आपल्यापासून सुरु करू यात...!

स्वामी विवेकानंद जयंतीच्या माझ्या सर्व वाघासारख्या तरुणांना खूप खूप शुभेच्छा !

No comments:

Post a Comment